राजर्षी छत्रपती शाहू महाराज |
जन्म : २६ जून १८७४
मूळ नाव : यशवंतराव जयसिंगराव घाटगे
आईचे नाव : राधाबाईसाहेब
१७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाटगे घरण्यातील यशवंतरावास दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू असे ठेवले. तेव्हापासून ते शाहू महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले.
शिक्षण :
सुरूवातीचे शिक्षण त्यांना कृष्णाजी गोखले , हरिपंत गोखले व फिट्झिराल्ड यांनी दिले त्यानंतर त्यांना इ. स. १८८५ मध्ये राजकोट येथील राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयात पाठविन्यात आले.
१८९० ते १८९४ या काळात महाराजांनी धारवाड येथे सर एस. एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्यकारभार आणि जगाचा इतिहास इत्यादी विषयांचे अध्ययन पूर्ण केले.
विवाह :
१ एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह बडोदा येथील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी झाला. शाहू महाराजांना चार अपत्ये होती. राधाबाई व आऊसाहेब या दोन मुली व राजाराम महाराज व शिवाजी महाराज ही दोन मुले.
राज्याभिषेक :
२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी झाला. वयाच्या २० व्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर बारसदार बनले. एकूण २८ वर्षे कोल्हापूर संस्थानचे ते राजे होते.
शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य :
महाराजांनी सत्तेचा वापर जनहितासाठी केला. जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता दूर करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. 1916 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश दिले.
शाहू महाराज विद्यार्थी वसतीगृहाचे आद्यजनक मानले जातात. खेड्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केल्याशिवाय त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार नाही, यासाठी त्यांनी वसतीगृहाची सोय केली. इ. स. १८९६ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरु केले, ते मराठा बोर्डिंग या नावाने ओळखले जाई. ब्राम्हणांपासून ते शुद्रांपर्यंत सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना ते खुले होते पण पुढे या वसतिगृहात अस्पृश्यता पाळली जाऊ लागली. परिणामी फक्त ब्राम्हण विद्यार्थीच तेथे शिल्लक राहिले. शूद्रातिशूद्रांना तेथे राहनेच कठिन झाले. त्यामुळे शाहू महाराजांनी ते वसतिगृह इ स. १९११ मध्ये बंद केले व प्रत्येक जातिसाठी स्वतंत्र वसतिगृहे त्यांनी सुरु केली. प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह काढल्याने प्रत्येक जातीला स्वतःचा विकास करून घेण्याची संधी मिळाली
राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतिगृहे :
१) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (१९०१)
२) दिगंबर जैन बोर्डिंग (इ.स. १९०१)
३) वीरशैव लिंगायत बोर्डिंग (इ.स. १९०८)
४) मुस्लिम बोर्डिंग -
५) मिस क्लार्क बोर्डिंग, (महार, मांग, ढोर चांभार या जातीतील मुलांसाठी होते.(इ.स. १९०८)
६)श्री नामदेव बोर्डिंग (इ.स. १९११)
७) पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (इ.स. १९१२)
८) इंडियन ख्रिश्चन वसतिगृह (इ.स. १९१५)
९) वैश्य होस्टेल (इ.स. १९१८)
१०) आर्य समाज होस्टेल (इ.स. १९१८)
११) ढोर चांभार होस्टेल (इ.स. १९१९)
१२) कायस्थ प्रभू वसतिगृह (इ.स. १९१२)
१३) इंदुमती राणीसाहेब वसतिगृह
१४) सारस्वत बोर्डिंग (इ.स. १९१२)
१५) देवज्ञ बोर्डिंग (इ.स. १९१६)
१६) शिवाजी वैदिक बोर्डिंग (इ.स. १९२०)
१७) सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग (इ.स. १९२०)
१८) सुतार बोर्डिंग (इ.स. १९२१)
१९) नाभिक विद्यार्थी बोर्डिंग (इ.स. १९२१)
२०) देवांग बोर्डिंग हाऊस (इ.स. १९२१)
२१) भोई समाज बोर्डिंग (इ.स. १९२१)
२२) राजपूतवाडी बोर्डिंग (इ.स. १९२१)
२३) रूकडी बोर्डिंग (इ.स. १९२१)
२४) प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग (इ.स. १९२२)
याशिवाय अनेक वसतिगृहांना शाहू महाराजांनी मुक्तहस्ते मदत केली. नाशिक येथील श्री. उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे ते प्रमुख पाहुणे होते. त्या वसतिगृहास त्यांनी १९,००० रु. देणगी दिली. पुण्याच्या शिवाजी मराठा हायस्कूलला २५००० रु. देणगी त्यांनी दिली होती. पुणे येथील नूतन मराठी विद्यालयास २००० रु. देणगी दिली, नागपूर येथील अस्पृश्य वसतिगृहास ५००० रु. दिले. या वसतिगृह चळवळीपासूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य :
१) गंगाराम कांबळे या दलित व्यक्तीला कोल्हापुरात हॉटेल चालविण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. ते स्वतः त्या हॉटेलमध्ये जात. चहा फराळ घेत. शाहूंच्या मृत्युनंतर गंगाराम कांबळेनी कोल्हापूरच्या नर्सर बागेत शाहूंचे स्मारक उभे केले.
२) कोल्हापूरच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते.
३) कोल्हापूरचे भवानी मंदिर त्यांनी अस्पृश्यांना खुले केले.
४) स्पृश्य-अस्पृश्य यांची सहभोजने त्यांनी घडवून आणली.
५) अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळेच्या संख्येत त्यांनी वाढ केली.
६) राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याची भूमिका त्यांनी घेतली तसेच या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास शिष्यवृत्ती देण्यात आली.
७) अस्पृश्य जातीतील ४ विद्यार्थ्यांना वकिली व ३ अस्पृश्य विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. वकील, डॉक्टर हे व्यवसाय उच्च वर्गीयांपुरतेच मर्यादित राहू नयेत अशी त्यांची इच्छा होती.
८) राजदरबारातील मंडळींचे खासगी नोकर म्हणून त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते.
९) जातिवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला.
१०)महार वतन पद्धत त्यांनी कायद्याने बंद केली . परंपरागत गावगाड्यामध्ये महार समाजाला वतनाच्या नावाखाली हलक्या दर्जाची कामे करावी लागत. त्या कामाचा मोबदला त्यांना जमिनीच्या रूपात मिळे. ही वतन पद्धती म्हणजे एका अर्थाने गुलामगिरीच होती.
११) गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जातींची(फासेपारधी, गारुडी) पोलिस ठाण्यावरची हजेरी त्यांनी बंद केली. गुन्हेगार जात अशी कोणतीही नसतेच असे ते म्हणत. या जातीतील लोकांना त्यांनी राजवाड्यात नोकऱ्या दिल्या.
१२) कोल्हापूर संस्थानात त्यांनी अस्पृश्य तलाठी नेमण्याचा निर्णय घेतला.
१३) इ.स. १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकऱ्यांत ५०% जागा राखून ठेवण्याचा निर्णय राजर्षी शाहू महाराजांनी घेतला.
१४) बारा बलुतेदारांना कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी दिली.
वेदोक्त प्रकरण :
१८९९ ते १९०१ या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. १८९९ मध्ये महाराज पुजा करीत असतांना पुरोहित नारायणभटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणू लागले. महाराजांनी याचे कारण विचारले असता नारायण भटजी म्हणाले, "वेदोक्ताचा अधिकार केवळ ब्राम्हण आणि क्षत्रियांनाच आहे, आपण क्षुद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही." यामुळे महाराजांच्या स्वाभिमानाला हादरा बसला. वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली. त्यामुळे ते महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील बेनाडिकर या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले
0 टिप्पण्या