आपल्या राजकीय व्यव्हारात डावा विचार , डावे पक्ष , उजवे पक्ष उजवी विचारसरणी असे शब्द वारंवार वापरले जातात यातील डावे-उजवे म्हणजे नक्की काय याचं अन्वेषण आज आपण करणार आहोत.
मराठी भाषेच्या संदर्भात डावा उजवा या शब्दांना एक तर दिशादर्शक अर्थ आहे किंवा अधिक प्रतिचा सरस व कमी प्रतिचा असे गुणदर्शक अर्थ आहे.राजकारणाच्या संदर्भात मात्र आपण डावे उजवे हे शब्दप्रयोग मूळ इंग्रजी तील leftist - rightist या शब्दप्रयोगाचे मराठी रूप म्हणून वापरतो . अर्थात leftist - rightist या शब्दांना जो अर्थ आहे तोच अर्थ आपल्या राजकारणातील डाव्या उजव्या या शब्दांना आपण बहाल केला आहे.
या दोन राजकीय संज्ञांचे मूळ फ़्रेन्च राज्यक्रांति मध्ये आहे तर झालं असं... फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात इस्टेटस्' (Estates)-जनरल (General) यांची पहिली संयुक्त बैठक(१७८९) जेव्हा निमंत्रित केली गेली तेव्हा फ्रेंच राजाच्या उजव्या हातास सरदार ,धर्मगुरु , सरंजामदार मंडळी बसली व डाव्या बाजूस इतरजन बसले. उजवीकडील मंडळी ही प्रस्थापित व्यवस्थेची समर्थक होती तर डावीकडील मंडळी आहे त्या व्यवस्थेत बदल घडवू म्हणणारी होती. तेव्हापासून डावे म्हणजे बदलाला अनुकूल, सुधारणावादी, पुरोगामी व उजवे म्हणजे स्थितिवादी, परिवर्तन विरोधी असे संबोधण्याचा प्रघात पडला.औद्योगिक क्रांती नंतरच्या व विशेषतः पहिल्या महायुद्धानंतरच्या राजकारणात डावे व उजवे हे वर्गीकरण रूढ झाले. या शब्दांचा विशिष्ट हेतूपूर्ण व भावपूर्ण अर्थ सर्वत्र मान्य झाला.
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास डावे म्हणजे उदारमतवादी व उजवे म्हणजे रूढीवादी किंवा परंपरावादी
सर्वसाधारणपणे जे प्रस्थापित समाजजीवनाचे व राजकारणाचे समर्थन करतात त्यांची गणना उजव्यात केली जाऊ लागली. याउलट सामाजिक व राजकीय क्रांति अथवा परिणाम कारक सुधारणा कर इच्छीणाऱ्यांची गणना डाव्या गटात होऊ लागली. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत पुढे पुढे साम्यवाद्यांची गणना सुद्धा डाव्यात होऊ लागली.
भारतीय राजकारणात भारतीय कम्युनिस्ट पक्ष(CPI) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष(CPM) हे डावे पक्ष आहेत तर शिवसेना भाजपा MIM हे उजवे पक्ष आहेत.
0 टिप्पण्या