Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

भारतातील अस्पृश्य जातींची सामाजिक स्थिति खरच तशी होती का?.....जशी सांगितली जाते...




                     हा प्रश्न जवळजवळ सर्वच शहरात जन्म झालेल्या मुलांना पडतो. खरतर जात आमच्या डोक्यातून काही केल्या जात नाही. कदाचित भविष्यातही जाणार नाही. तथाकथित उच्च जातित जन्मलेल्या व्यक्तीला जातीचा अहंकार हा असतोच त्यामुळेच नावा आधी किंवा आडनावानंतर वेगवेगळी विशेषने लावली जातात. मग हेच मंडळी बोलतात आम्ही जात पात काही मानत नाही तरी कशाला हवय आरक्षण अजुन...असो
मूळ मुद्द्यावर येऊ तर झाल अस एकदा एक पिक्चर बघितला त्याच नाव होते "शुद्रा द राइजिंग" तो बघितल्यावर आम्हालाही वाटल की हे जरा अतिच होतय.  नाही ...जाती पातीच्या भानगडी असतील हो पण देवाच नाव घेतले म्हणून जीभ कापली जाणे वैगरे हे जरा अतिच होतय असलं काही नव्हते आपल्या भारतात , आणि व्हाट्सएप वरील एखाद दूसरा message आमची धारणा अधिक बळकट करत असतो. म्हणून आम्ही म्हटलं याविषयी अजुन खात्रीलायक काही माहीती भेटतेय का बघू.
तेव्हा एक लेख वाचन्यात आला. कुठल्याही संवेदनशील व्यक्तिच्या डोळ्यात पाणि आणेल असा हा लेख
        भारतातील पहिल्या दलित महिला लेखिका किंवा निबंधकार "मुक्ता साळवे" यांचा हा लेख. हा लेख म्हणजे १८५५ साली ‘ज्ञानोदय’ या मासिकात १५ फेब्रुवारी आणि १ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झालेला एक निबंध.

१८४१ साली पुण्यामध्ये मुक्ताचा जन्म झाला. वस्ताद लहुजी साळवे यांची ही पुतणी. अस्पृश्यांच्या मुलींना म. फुल्यांच्या शाळेत आणण्यात लहुजी साळवेंचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपल्या पुतणीला म्हणजे मुक्ताला म. फुल्यांच्या शाळेत दाखल केले होते. याच मुक्ताने इयत्ता तिसरीमध्ये असताना वयाच्या चौदाव्या वर्षी  "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" हा निबंध लिहिला. या निबंधात तिने अस्पृश्यांच्या व्यथा-वेदना मांडलेल्या होत्या. या निबंधासाठी मुक्ताचा पुण्यामध्ये विश्रामबागवाड्यात तत्कालीन कलेक्टरच्या पत्नी मिसेस जोन्स ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर कॅन्डी यांनी मुक्ताला बक्षीस म्हणून लेखणी आणि चॉकलेट दिले.

             पेशवेकाळात आणि ब्रिटिश काळात अस्पृश्यांची परिस्थिती कशी होती हे जाणून घ्यायचे असेल तर प्रत्येक व्यक्तिने मुक्ता साळवेंनी लिहिलेला हा निबंध अवश्य वाचला पाहिजे. मुक्ताबाई साळवे यांनी लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे.

मुक्ताबाई साळवे यांनी आपल्या 'मांग-महाराच्या दुःखाविषयी निबंध' च्या पूर्वार्धात अस्पृश्यांच्या समाज जीवनाच्या अवनतीचा आढावा घेऊन मनुविचारप्रणालीवर घणाधाती प्रहार करून पेशवाईतील अस्पृश्यांवरील अमानुष अत्याचाराचा पाढा वाचला. तर उत्तराधात इंग्रजी सरकारमुळे होऊ घातलेल्या परिवर्तनाचा बदलाचा व समाज सुधारकांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी अस्पृश्यता उधळून लावण्यासाठी मांग-महारांनी कठीण परिस्थितीतही शिक्षण घेऊन ज्ञानवंत व शीलवंत होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


मूळ लेख जसाच्या तसा पुढीलप्रमाने :


मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध


                             ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दुःखाविषर्यी भरविलें; त्याच जगत्कत्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतलें आहे; परंतु बुद्धिदाता व निबंध फळदेता, मांगमहारांस व ब्राह्मणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे.

       महाराज, आतां जर वेदाधारें करून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचें खंडण करावें तर हे आम्हापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषेकरून लाडूखाऊ ब्राह्मणलोक असे म्हणतात कीं, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्याचें अवलोकन करावें. तर ह्यावरून उघड दिसतें कीं, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदांप्रमाणे वर्तणूक करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पहाण्याची मोकंळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहों असें साफ दिसत्ते कीं नाही बरे? हर हर ! असे जे वेद कीं ज्यांचे (ब्राह्मणांच्या मताप्रमाणे) अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचारण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व ( दोष ) येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलाच्या आधारेकरून आणि ब्राह्मण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्तकमी आम्हापेक्षां सुखी आहेत असें वाटते तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हांस कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्या सारख्या रीतीने घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेंच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावें. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा अभिमान करावा असें आमच्या मनांत देखील न येवो.

                    आम्हा गरीब मांगमहारांस हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पासून पुरण्याचा  व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. आम्हा मनुष्यांस ब्राह्मण लोकांनी गाई म्हसीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्यावेळी बाजीरावाचा राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणें तरी मानीत होते कीं काय ? पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय ? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारा कोण होता बरे ? त्यासमयी मांग अथवा महार ह्यांतून कोणी तालीमखान्यापुढून गेला असतां गुलटेकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी; तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार ? कदाचित कोणास वाचतां आलें व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राह्मणांनी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजीं धोंकट्या बगलेत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावें की काय ? असे बोलून तो त्यांस शिक्षा करी.

                         दुसरें असें कीं, लिहिण्याचीच बंदी करून हे लोक धाले की काय ? नाहीं.बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळींत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवाच्या गुणाने येथील महार तो काय ? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतु की, कांही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असें मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंत:करणास द्रव येतो की काय ? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार ? बरे, हे उघडच सिद्ध होतें की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटें पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्यांतल्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धां नसतें म्हणून हिंव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यांस किती दुःख होत असेल बरें ! ह्याचा विचार स्वतांच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यांस बाळंतरोग झाला तर त्यांस औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार ? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता कीं त्यानें लोकांस फुकट औषधे दिली ?

                मांगमहारांच्या मुलांस ब्राह्मणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघालें तर ते सरकारांत जात नाहीत. ते म्हणतात की, आपणांस उच्छिष्ट आणायास जावें लागतें. असें म्हणून उगीच रहातात. हाय हाय, कायरे भगवान, हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहूं लागलें तर मला रडूं येतें. ह्या कारणास्तव भगवंतानें आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारांस येथें पाठविलें. आणि आतां ह्या राज्यांतून आमचीं जी दुःखें निवारण झालीं. ती अनुक्रमे पुढे लिहितें :

             शूरपणा दाखविणारे व गृहांत उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिमकजी, आंधळा पानसरा, काळ, बोहार इत्यादि हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्‍या घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसहि देहान्त शासनें करीत होते तीं बंद झालीं; आणि पुणे क्रांती मांगमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजाच्या राज्यांत असी अंधाधुंदी होती कीं, त्याच्या मनास चाटेल त्यानें मांग महारांवर नाना प्रकारची तुफान घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते; ती बंद झाली. ( किल्याच्या ) पायांत घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमहार ह्यातून कोणी बरीक पांघरूण पांघरले असतां ते म्हणत की, ह्यानीं चोरी करून आणलें, हें पांघरूण ता ब्राह्मणांनींच पांघरावें. जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत, पण आतां इंग्रजांच्या राज्यांत ज्यास पैसा मिळेल त्यानें घ्यावें. उंच वर्णातील लोकांनी (चा) अपराध केला असतां मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते; ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. आंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठें कोठें झाली. गुलटेंकडीच्या मैदानांत चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारांत फिरण्याची मोकळीक झाली.

                   आता नि:पक्षपाती दयाळू इंग्रज सरकाराचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहितांना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी की, जे ब्राह्मण पूर्वी आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आतां माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधु आम्हांस ह्या महान दुःखांतून बाहेर काढण्याविषयीं रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असें नाहीं. त्यांतून ज्यांचा विचार सैतानाने नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करितात. आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयीं प्रयत्न करितात त्यांस म्हणतात की, तुम्हास जातीबाहेर टाकू.

                आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रेज सरकारहि मदत करितात. म्हणून ह्या मांडलेल्या शाळाला फार सहाय आहे. अहो दरिद्रांनी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, तुम्ही रोगी आहांत, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आतां झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाहीं; परंतु हेंहि माझ्याने सिद्ध करवत नाहीं. ह्यास उदाहरण, जे शुद्ध शाळेंत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेहि एकाद्या वेळेस रोमांच उभे रहाण्याजोगें वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहांत.


                                                               _ज्ञानोदय



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement