अस्पृश्य समाजातील अस्मीता जागविणारा पहिला महामानव म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या या युगप्रवर्तकाचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्हयातील मंडणगाव तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मुळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार या पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले.
पूर्ण नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर. भीमराव इ.स. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या 'एल्फिन्स्टन' कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. एलफिन्सटन काॅलेज मधे प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी होते. इ.स. १९१२ ला पदवी (बी.ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील 'कोलंबिया' विद्यापिठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे साहाय्य लाभले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. इ.स. १९१५ मध्ये त्यांनी 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. ची पदवी मिळविली व त्यांच्या National Dividant of India a historical and analitical study' या प्रबंधा बद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. ही पदवी बहाल केली.
अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करुण आंबेडकर भारतात परत आले व बडोदा संस्थानात नोकरी केली . त्यानंतर आंबेडकर, कायदा व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले, परंतु आर्थिक अडचणी मुळे ते परत भारतात आले. काही काळ त्यांनी मुंबईच्या 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.
मुंबईमध्येच आंबेडकरांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली.३१ जानेवारी १९२० मध्ये त्यांनी 'मूकनायक' हे साप्ताहिक सुरु केले. माणगांव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला.
1920 मध्ये कोल्हापुरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते इंग्लॅण्डला गेले व तिथे त्यांनी लंडनच्या विद्यापीठात BSC केली. व 'The problem of rupee' या प्रबंधाबद्दल त्यांना डि. एस. सी. ही पदवी मिळाली. त्यानंतर ते बैरिस्टर परीक्षेत उत्तीर्ण झाले.
बाबासाहेब विदेशात जाऊन अर्थशास्त्रात ’डाॅक्टरेट’ पदवी मिळवीणारे पहिले भारतीय होते. 1923 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात त्यांनी वकीली सुरु केली.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी इ.स. १९२४ ला 'बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तसेच 'बहिष्कृत भारत' हे साप्ताहिक सुरु केले. तसेच या सभेतर्फे दलित समाजातील तरुण आणि प्रौढांसाठी रात्रशाळा चालवणे वाचनालये सुरु करने यांसारखे उपक्रम सुरु करण्यात आले. 1946 मध्ये त्यांनी 'peoples education society' ही संस्था स्थापन केली तिच्या वतीने मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरु केले
हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी इ.स. १९२७ साली 'समाज समता संघ' स्थापना केला. या संघा तर्फे 'समता' हे आणखी एक वृत्तपत्र सुरु केले. इ.स. १९२७ मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधीमंडळावर निवड झाली.
महाड या गावी चवदार तळयाचे पाणी पिण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता.तेथील नगरपालिकेने ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी सुरु केले होते. परंतु सवर्ण हिंदूच्या भीतीने हे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हते. तेव्हा आंबेडकरानी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह करून तळयाच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे, याची सर्वांना जाणीव करून दिली. सामाजिक भेदभाव आणि उच्च निच्च भेदभाव याचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले.
हिंदू धर्मातील उच्च वर्णियांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना नाकारला होता. या विरुद्ध डॉ आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी मंदिरासमोर सत्याग्रह केला त्याबाबतित आंबेडकर म्हणतात की हिंदुत्व ही जितकी अस्पृश्यांची मालमत्ता आहे तितकी ती अस्पृश्यांची देखील आहे. म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झालाच पाहिजे.' १९३५ पर्यंत हा सत्याग्रह सुरु होता. अशाच प्रकारे अचलपुर येथील दत्त मंदिर, सोलापूरचे सिध्देश्वर मंदिर, अमरावतीचे अंबामाता मंदिर सर्वाना खुले करण्यात आले. यामागे आंबेडकरांची प्रेरणा होती..
नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या गोलमेज. परिषदेत डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तसेच पुढील दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे प्रतिनिधीत्वही त्यांनीच केले. यामध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचीही मागणी केले होती.
जातीय निवाड्या विरुध्द महात्मा गांधीनी पुणे येथे येरवडा तुरुंगातच प्राणांतिक उपोषण सुरु केले. तेव्हा तडजोड' म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात असे ठरले. त्यानुसार अशा १४८ राखीव जागांसाठी डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ ला करार झाला. यालाच पुणे करार अथवा येरवडा करार असे म्हणतात.
१९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडियाची' स्थापना केली तर १९४२ साली त्यांनी 'शेड्युल कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकर नेहरु मंत्रीमंडळात कायदा मंत्री झाले. घटना समीतीच्या 'मसुदा समितिचे' ते अध्यक्ष होते. हिंदूकोड बिलाची निर्मित्ती ही त्यांनीच केली. पुढे याच बिलाच्या वादावरुन संसदेत श्रेष्ठींशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १३ ऑक्टोंबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील 'येवला' येथे बोलतांना धर्मातराची जाहीर घोषणा केली. त्यामुळे देशात वादळ उठले. येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली की, 'मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' परंतु प्रत्यक्षात धर्मांतराचा निर्णय १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी त्यांनी अमलात आणला नागपूर येथे त्यांच्या सोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी 'बौध्द' धर्मात प्रवेश केला. बौध्द धर्माची दिक्षा त्यांनी 'चंद्रमणी महास्थिर' यांच्याकडून घेतली.
बाबासाहेब विद्येचे भोक्ते होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथ संख्या जवळ जवळ 50 हजार होती. डॉ. आंबेडकरानी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यामुळे समाज परिवर्तनास मदत झाली. अनेक वर्षाच्या राजकीय, सामाजिक, कामांच्या न संपणाऱ्या दगदगीने आंबेडकरांची प्रकृती फारच खराब झाली होती. मधुमेहाचा त्रास त्यांना फार वर्षापासून होताच. राज्यघटना तयार करण्याचे काम चालू असतानाच ते फार आजारी झाले. त्यांना मुंबईला रुग्णालयात ठेवले होते. तेथे डॉ. शारदा कबीर त्यांच्यावर औषधोपचार करीत होत्या. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई १९३४ साली मरण पावल्या. त्यानंतर आपले आयुष्य ते एकट्यानेच ओढत होते. आता या उतार वयात व बऱ्या न होणाऱ्या आजारपणात त्यांना सोबतीची आधाराची गरज भासू लागली. डॉ. शारदा कबीरही आंबेडकरांच्या उच्च आचार विचारांनी त्यांच्या भक्त बनल्या होत्या. दोघांनी विवाह करण्याचे ठरविले व मुंबईला अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाला. त्यांच्या नवीन पत्नीने पुढल्या सात-आठ वर्षात आंबेडकरांची फार ममतेने सेवा केली.
६ डिसेंबर १९५६ रोजी हा धगधगणारा ज्वालामुखी अखेर शांत झाला. दिल्ली येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने सारा देश हादरला. दलितांना तर आपले मायेचे छत्र हरपले, असे वाटले. त्यांच्या शोकास पारावर राहिला नाही. आंबेडकरांचा पार्थिव देह मुंबईला आणण्यात आला. दादरच्या चौपाटीवर (चैतन्यभूमी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अखंड जळणारी ज्वाला चितेच्या ज्वालामध्ये मिसळून गेली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंबेडकरांनी स्वतःचा जीवनमार्ग शोधला आणि स्वतः बरोबरच साऱ्या दलित वर्गालाही त्या मार्गावरुन चालण्याची 'प्रेरणा दिली. त्यांच्या सारखा ज्ञानोपासक शतकातून एखादाच होत असतो. त्यांचा स्वतःच ग्रंथसंग्रह अक्षरश: प्रचंड म्हणावा असा होता. मृत्यूपूर्वी त्यांनी तो मुंबईत स्वतः स्थापन केलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाला देऊन टाकला.
शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करावयाचा की, आंबेडकरांनी भारताला कोणती देणगी दिली? मला वाटते त्यांनी एक अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली. अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला, आणि हजारो वर्षे अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला. यामुळे सर्व भारतीय आधुनिक मनू म्हणून त्यांचा अतीव आदराने नेहमीच सन्मान करतील! बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
श्रेष्ठ कायदेपंडित व अस्पृश्यांचा तडफदार नेता म्हणून आंबेडकरांची स्मृती चिरंतन राहील.
0 टिप्पण्या