जन्मापासूनच आपले राजकीय सामाजिकीकरण सुरू होते. आपल्या नकळत आपल्याशी राजकारणाची ओळख करून देणारे महत्त्वाचे राजकीय प्रतीक म्हणजे राष्ट्रध्वज होय. शालेय जीवनाच्या आरंभीच या प्रतीकाचा आपल्याला परिचय होतो. त्याचा आदर केला पाहिजे, हे आपण झेंडावंदनासारख्या कार्यक्रमातून शिकतो. त्याचे पावित्र्यही आपल्या मनावर बिंबवले जाते. राष्ट्रध्वज हे आपल्या स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे हे आपल्यावर बिंबते. ध्वजाला वंदना ही राष्ट्राच्या स्वातंत्र्याला, राष्ट्राला केलेली वंदना आहे असे आपण मानतो. ध्वजाची अवहेलना ही आपली अवहेलना आहे असे आपण मानतो. राष्ट्र ध्वज फडफडत राहणे हे आपण आपल्या स्वाभिमानाचे लक्षण मानतो. जो जित प्रदेशात फडकविणे हे आपण आपल्या विजयाचे लक्षण मानतो. तो अर्ध्यावर उतरविला जातो तेव्हा राष्ट्राची शोकाकुलता आपल्या ध्यानी येते. भारतीय या नात्याने ध्वजाशी आपण असे एकरूप झालेलो असतो. ध्वज आपले राजकीय भावविश्व व्यापून टाकतो.
आपण अधिक जाणते होतो तेव्हा ध्वजाचे रंग, रूप, पोत याचे आपण काळजीपूर्वक निरीक्षण करतो. त्यामागील अर्थ आपण समजावून घेतो. ध्वजाचा केसरी रंग त्यागाचे प्रतीक, ध्वजावरील अशोक चक्र हे धर्म किंवा सदाचरण तसेच प्रगतिशील चळवळीचं प्रतिनिधित्व करतं. हे कायद्याचं चक्र असून या ध्वजाखाली जो काम करेल त्याने आपली कार्यतत्त्वं पाळणं अपेक्षित आहे. योग्य दिशेने पुढे गेले पाहिजे कारण एका जागी थांबल्यास प्रगती खुंटते, असं हे चक्र सांगतं. अशोकचक्रावरील २४ आरे म्हणजे २४ सद्गुणांचे द्योतक आहे , पांढरा रंग शांततेचा तर हिरवा रंग सुफलतेचे प्रतीक असल्याचे आपल्याला समजते आणि आपला ध्वज तिरंगी का याचा उलगडा होतो. ध्वज, त्यातील रंग, त्यावरील चिन्हे हे अशा प्रकारे आपली मूल्ये, ध्येये, उद्दिष्टे सांगून जातात. त्याविषयीची अपुरी, चुकीची माहिती व अज्ञान यांतूनही आपली राजकीय मानसिकता विपरीतपणे दडू शकते. उदाहरणार्थ, तिरंगी झेंड्यामध्ये जमातवादाचा संदेश वाचणारेही आपल्याला भेटतात. त्यांच्या मते केसरी रंग हिंदूंचा तर हिरवा मुस्लीम वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. अशा अर्धवट आकलनातून मग ही मंडळी हा ध्वज द्विखंडित राष्ट्राचे प्रतीक आहे' यासारख्या सर्वस्वी चुकीच्या निष्कर्षाप्रत येतात. या देशात हिंदू बहुसंख्य असल्याने तिरंगी झेंड्याऐवजी भगव्या रंगाचाच ध्वज अधिक उचित ठरला असता असाही मताविष्कार झाल्याचे आपण पाहतो. हे निष्कर्ष अथवा अर्थ हे आपल्या घटनाकारांच्या मनातील उद्दिष्टांशी अर्थातच सुसंवादी नसतात. किंबहुना त्या उद्दिष्टांचा तो विपर्यास असतो. अशा रितीने राष्ट्रध्वज, त्याचे स्वरूप, त्या भोवतालचा मूळ सांकेतिक अर्थ, आपले त्याविषयीचे ज्ञान या सर्वांतून आपली राजकीय मानसिकता घडविण्यामध्ये प्रतीकाचा वाटा मोठा असतो.
हे पण वाचा...आपले राष्ट्रीय गीत - वंदे मातरम
0 टिप्पण्या